बँकांची कामे शक्यतो आजच करून घ्या, मंगळवारी बँकांचा देशव्यापी बंद

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने मंगळवारी, २२ आॅगस्टला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशातील सर्व बँक मंगळवारी बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी, ग्राहकांनी महत्त्वाची कामे सोमवारीच आटपण्याचे आवाहन बँक कर्मचा-यांनी केले आहे.
फोरमचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरणाला फोरमचा विरोध आहे. बँक कर्मचाºयांच्या मागण्यांवर फोरमच्या शिष्टमंडळाने इंडियन बँक असोसिएशनची (आयबीए) १६ आॅगस्ट रोजी भेट घेतली. दरम्यान झालेल्या चर्चेत फोरमच्या एकाही मागणीवर निर्णय घेण्यास आयबीएने असमर्थता दर्शवत संप मागे घेण्याचे आवाहन केले. आयबीएच्या म्हणण्यानुसार फोरमने केलेल्या सर्व मागण्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असून त्यावर सरकारच निर्णय घेऊ शकते. परिणामी, आयबीएच्या आवाहनाला नकार देत फोरमने संपाचा निर्णय घेतला आहे.
बँकांचे खासगीकरण थांबवताना बड्या कॉर्पोरेट्सच्या अनुत्पादित कर्जांची पुनर्बांधणी करू नये (एनपीए राईट आॅफ), ही फोरमची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय एनपीए वसुलीसाठी संसदीय समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, कर्ज बुडव्यांविरोधात फौजदारी गुन्हे करण्याची तरतूद करावी, थकीत कर्जांचे हिशोब ठेवून ते वसूल करण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशा विविध मागण्या फोरमने केल्या आहेत. या फोरममध्ये एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू, एनओबीओ
या सर्व संघटना सामील आहेत.