राज्यातील गणेश मंडळे बुजविणार खड्डे!

यंदाचा गणेशोत्सव अधिक समाजाभिमुख करण्यासाठी ‘खड्डे बुजवा, जीव वाचवा’ असे अभियान हाती घेण्यात येणार असून राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची ही अभिनव संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्धार गणेश मंडळांनी केला आहे.
राज्य धर्मादाय आयुक्त म्हणून डिगे यांनी आजच पदभार स्वीकारला. पहिली बैठक त्यांनी गणेशोत्सव मंडळांची घेतली. या वेळी अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्यासह गणेश गल्ली, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव, जी.एस.बी सेवा मंडळ, गणेशोत्सव समन्वय समिती आदींचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रभरात सुमारे लाखभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून या सर्व मंडळांना एका व्यासपीठावर आणून उत्सव अधिक समाजाभिमुख करणे आणि गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाºया समस्यांच्या निराकरणासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यभरातील गणेश मंडळांनी आपापल्या परिसरात रस्त्यांवर पडलेले खड्डे स्वनिधीतून (वर्गणीतून) बुजविण्यासाठी ‘खड्डे बुजवा-जीव वाचवा’ हे अभियान हाती घ्यावे, तसेच उत्सवासाठी जमा होणाºया वर्गणीपैकी किमान दहा टक्के रक्कम आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजू विद्यार्थी आणि रुग्णांवर खर्च करावी, असा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांनी मंडळांच्या प्रतिनिधीसमोर ठेवला. त्यास सर्वांनी अनुकूलता दर्शविली.
योजनांची जनजागृती करणार
धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी विशेष योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती गणेशभक्तांना मिळावी यासाठी उत्सव काळात डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी मोफत उपचारांची सोय असते. आपल्या परिसरातील पिवळे शिधापत्रक असणाºया रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गणेशोत्सव मंडळ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय संयुक्तपणे प्रचार, प्रसाराचे काम करेल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
चार अधिकाºयांची नियुक्ती
धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संबंधित कामांचा निपटारा करण्यासाठी किमान दोन अधिकाºयांची नियुक्ती करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार तातडीने चार अधिकाºयांची नियुक्ती करून तसे आदेशही काढले. रोज दुपारी तीन ते पाच या वेळेत हे अधिकारी केवळ गणेशोत्सव मंडळांशी संबंधित कामे करतील, असे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले.
धर्मादाय आयुक्तालय आणि गणेशोत्सव मंडळांची अशी एकत्र बैठक कधीच झाली नाही. या बैठकीत निर्विघ्नपणे उत्सव साजरे करण्यासह गणेशोत्सव मंडळांच्या अडचणींबाबत चर्चा झाली. धर्मादाय आयुक्तांचा मंडळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. धर्मादायच्या योजना राज्यभर पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळे विशेष प्रयत्न करतील. - जयेंद्र साळगावकर