कांदा दरवाढीची केंद्राला धास्ती

गेल्या पंधरवड्यापासून कांदा लिलावात तेजी निर्माण होऊन परिणामी बाजारात कांद्याने चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: आॅक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा चढ्या भावातच स्थिर राहण्याच्या शक्यतेने केंद्र सरकार धास्तावले असून, शुक्रवारी केंद्रीय कृषी व पणन मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशकात धाव घेऊन कांद्याच्या सातत्याने होणाºया दरवाढीचे गणित समजावून घेतले आहे.
जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये व विशेष करून निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याला क्व्ािंटलमागे सरासरी २००० ते २४०० रुपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, मात्र लिलावानंतर खुल्या बाजारात विकला जाणारा कांदा थेट ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून, त्याचा सामान्य ग्राहकाला फटका बसू लागला आहे. विशेष करून उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याचे चढे दर त्या त्या राज्य सरकारांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. महाराष्टÑ वगळता अन्य राज्यांमध्ये पावसामुळे कांद्याची आवक घटली, परिणामी महाराष्टÑातील कांद्याने जवळपास देशातील प्रत्येक बाजारपेठेवर कब्जा केला आहे. येणाºया दोन महिन्यांत हीच परिस्थिती कायम राहणार असून, सध्या खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कांदा नजीकच्या काळात दुप्पटीने विक्री होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करू लागले आहेत. कांदा रडविण्याच्या शक्यतेने केंद्र सरकारने अभ्यास सुरू केला असून, त्यासाठी कृषी व पणन मंत्रालयाने कांद्याच्या चढ्या दरामागचे गणित समजावून घेण्यासाठी नाशिक गाठले. अभयकुमार व सुरेंद्र सिंग या दोन अधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेऊन कांदा लिलावाची पद्धती व दर ठरविण्याची प्रणाली जाणून घेतली. यावेळी बाजार समित्यांचे संचालक तसेच व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांशीही या पथकाने चर्चा केली. देशातील सर्वच राज्यांमधून कांद्याची मागणी वाढल्यामुळे त्या प्रमाणात होत असलेली आवक पाहून व्यापारी कांदा लिलावाचे दर ठरवित असल्याचे या पथकाला सांगण्यात आले, त्याचबरोबर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्णातून अन्य ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कांद्याची व्यापाºयांकडून साठवणूक केली जात असल्यामुळे दरवाढ झाल्याचा समज घेऊन आलेल्या या केंद्रीय पथकाला व्यापाºयांनी त्यांची बाजूही समजावून सांगितली. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे व्यापारी कांद्याची साठवणूक करू शकत नाही हे त्यांना पटवून देण्यात आले, शिवाय तसे झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कांद्याची बेकायदेशीर साठवणूक करणे गुन्हा ठरविण्यात आल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर या पथकाने लासलगाव बाजार समिती व तेथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांशीही संवाद साधला.
आॅक्टोबरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार
खरिपाच्या कांद्याची सध्या लागवड करण्यात आलेली असून, तीन महिन्यांपूर्वी भाव पडल्याने शेतकºयांनी साठवून ठेवलेला कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी आणला आहे. नवीन कांदा येण्यास आॅक्टोबर महिना उजाडणार आहे. महाराष्टÑातील कांद्याला पश्चिम बंगाल, हरियाणा, ओरिसा, बिहार, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अधिक मागणी आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांत फक्त ३५ रॅक पाठविणाºया नाशिक जिल्ह्णातून यंदा गेल्या तीन महिन्यांत १७२ कांद्याचे रॅक रवाना करण्यात आले आहेत.