स्टीव्ह जॉब्स म्हणाले हाेते; दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वेळ घालवू नका, मी तेच केले- विशाल सिक्का

दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. बिनबुडाच्या आरोपांमुळे पद सोडत असल्याचे त्यांनी म्हटले. संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘ज्यांच्याकडून पाठबळाची अपेक्षा होती तेच टीका करत होते.’ सिक्का यांच्या समर्थनार्थ संचालक मंडळाने मूर्ती यांना लक्ष्य केले. ‘मूर्ती यांनी चुकीच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून भंडाफोड करण्याची धमकी दिली होती,’ असे बोर्डाने म्हटले आहे. ‘हे आरोप खालच्या स्तराचे आहेत. यावर योग्य वेळी भाष्य करेन,’ असे मूर्ती म्हणाले. राजीनाम्यात सिक्का म्हणतात, ‘स्टीव्ह जॉब्स म्हणाले हाेते -इतरांच्या नादी लागून वेळ वाया घालवू नका. अंतर्मनाचे ऐका. आता मी वेगळे काही करेन.’

राजीनाम्याची ४ कारणे
सिक्कांच्या पॅकेजवर मूर्तींना होता आक्षेप
सिक्का १ ऑगस्ट २०१४ ला सीईओ झाले. महसूल १५ हजार कोटी वाढला, पण संस्थापकांशी वाद होता
- २०१६मध्ये सिक्का यांना ७० कोटींचे पॅकेज. मूर्तींचा आक्षेप. कंपनी म्हणाली, कार्यक्षमतेचा आधार.
- माजी सीएफआे राजीव बन्सल यांना दिले १७.३८ कोटींचे पॅकेज.
- केंद्रीय मंत्री जयंत सिन्हांच्या पत्नीस संचालक नेमण्यावरून वाद.
- इस्रायलची पनाया ही कंपनी ताब्यात घेताना आवश्यकतेपेक्षा अधिक किंमत मोजल्याचा आरोप.


टाटांनीही हटवले ‘बिगरटाटा’ चेअरमन
नारायणमूर्ती आणि सिक्का वाद रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यासारखाच आहे. टाटा सन्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्या बिगर टाटा चेअरमनला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवले होते.


दोन लाख कर्मचाऱ्यांना ई-मेल
सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन लाख कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून माहिती दिली. सकाळी ९.२७ वाजता ब्लॉगवरही पत्र पोस्ट केले. १७ महिन्यांनंतर त्यांनी ब्लॉग लिहिला. ९.५७ वाजता राजीनाम्याचे ट्विट केले.
शेअर ९.६ टक्के घसरले, बायबॅकवर आज निर्णय
सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर ९.६ टक्के घसरले. कंपनी मूल्य २२ हजार ५१९ कोटींनी कमी होऊन २ लाख १२ हजार ३३ कोटी झाले. मूर्ती यांच्याकडे ३.४४ टक्के शेअर्स होते. याचे मूल्य ७७० कोटी कमी झाले. बायबॅकवर कंपनी बोर्ड १९ ऑगस्टला निर्णय घेईल.

७% घटले होते सिक्कांचे पॅकेज
२०१६-१७ मध्ये कमी बोनसमुळे सिक्कांचे पॅकेज कमी झाले. अतिरिक्त नगदी ४८.७३ कोटींहून ६७% घटून १६.०१ कोटी राहिली. बोनस व स्टॉक मिळून ४५.११ कोटी मिळाले. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत ७% कमी आहेत.