बँक कर्मचाऱ्यांचा २२ ऑगस्टला संप

बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या ११ व्या वेतनकराराची पूर्तता वेळेवर व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ‘युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स’च्या ( यूबीएफयू) माध्यमातून २२ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे, अशी माहिती नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सतर्फे (एनओबीडब्ल्यू) पत्रकार परिषदेत देण्यात आली.

संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री उपेंद्र कुमार आणि अध्यक्ष रामनाथ किणी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पी. पी. सिंह, के. आर. पूंजा आणि मधू सातवळेकर आदी उपस्थित होते. ‘सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची आवश्यकता नसताना सरकार विनाकारण हा अजेंडा राबवत आहे. स्टेट बँकेत सहयोगी बँका विलीन केल्याने ३० हजार कोटी रुपयांचे बुडीत कर्ज स्टेट बँकेच्या माथी मारले गेले असून, दहा हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. विलीनीकरणाच्या निर्णयाचे दुष्परिणाम सध्या दिसून येत आहेत, त्यातच केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सध्या बँकांच्या विलीनीकरणाचा विषय अजेंड्यावर नसल्याचे संसदेत सांगितले. मात्र, याबाबत बँक अधिकारी, कर्मचारी संघटनांशी संवाद साधण्यास ते नकार देत आहेत. बँकांशी संबंधित निर्णय घेताना बँक कर्मचाऱ्यांना त्यापासून लांब ठेवणे अयोग्य आहे,’ असे उपेंद्र कुमार आणि किणी म्हणाले.