‘भाजपनेच विकास केला’

मिरा-भाईंदर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक निधी दिला आहे. त्यामुळे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपला या निवडणुकीत पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

मिरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी म‌िरारोड येथील शांतीपार्क भागात बालाजी हॉटेल जंक्शन येथे मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत मिरा-भाईंदरला जितका विकास निधी दिला, तेवढा या आधी कोणीही दिला नाही. म‌िरा-भाईंदरचा पाणीप्रश्न आम्ही सोडवाला. २४ तास पाणी मिळावे म्हणून सूर्या पाणीयोजना आणली असून या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पाण्याची कमतरता अजिबात भासणार नाही. कामे करून आम्ही तुमच्याकडे मते मागायला आलो आहोत. पाणी, मेट्रो ही कामे आम्ही केली आहेत. एमएमआरडीएचा अध्यक्ष मी आहे, राज्याचा मुख्यमंत्री मी आहे, सर्व कामे मी करतो मग श्रेय दुसरा कोणी कसा घेतो, असा सवाल त्यांनी सेनेचे नाव न घेता केला.