ऐरोलीतील हवा राज्यात सर्वोत्तम

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षांत नवी मुंबई शहराच्या पर्यावरणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. ऐरोली हा हवा गुणवत्तेच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम विभाग ठरला आहे. पर्यावरण गुणवत्ता निर्देशांक (एदक — ७३.६६) आणि पर्यावरण कामगिरी निर्देशांक (एढक झ्र् ६७२.५०) यामध्ये मागील वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे २.७ आणि ७.९ अंकांनी वाढ झाली आहे. या वाढीमध्ये हवा व पाणी गुणवत्तेमधील सुधारणा, घनकचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, पाण्याच्या गुणवत्तेची देखभाल, पाण्याच्या अपव्ययातील घट, खारफुटीचे संरक्षण, व नागरिकांचा सहभाग अशा विविध घटकांचा सहभाग आहे, अशी माहिती पालिकेने दिली.

पर्यावरण स्थिती अहवालानुसार सन २०१६-१७ मध्ये नवी मुंबई शहरातील सोडियम ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व ओझोन च्या  प्रदूषकांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. नवी मुंबईत वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण निकषांपेक्षा जास्त असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत धुलीकणांच्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट होण्यामागे मुख्यत्वे औदयोगिक क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांची पूर्तता, २२ उद्योग समुहांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी पाईप नॅचरल गॅसच्या इंधन वापरामुळे इंधन ज्वलनात घट होऊन हवा प्रदुषकांच्या प्रमाणात झालेली घट, दगडांपासून खडी निर्माण करण्याच्या उद्योगांत धूलिकण प्रतिबंध उपाययोजना तसेच अनेक दगडखाणींच्या कराराची मुदत संपुष्टात आल्याने त्या बंद करणे या कारणांमुळे झाली आहे. तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन, ई-कचरा नियोजन हे देखील फायद्याचे ठरत आहे.