धमक्या देऊ नका! जपानचा चीनला इशारा, हिंदुस्थानलाच पाठिंबा

हिंदुस्थान आणि चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून डोकलाम मुद्द्यावरून तणाव वाढत आहे. आता या तणावात जपाननेही उडी घेतली असून चीनने सैन्याच्या बळावर धमक्या देऊ नये, अशी सूचना जपानने केली आहे. डोकलाम मुद्द्यावरून अमेरिका आणि जपान या दोन्हीही देशांनी हिंदुस्थानला पाठिंबा दिला असून अमेरिकेने हा मुद्दा शांततेने सोडवण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे जपानने चीनने केलेलं हे अतिक्रमण अवैध असल्याचं म्हटलं आहे.

जपानचे राजदूत केंजी हिरामात्सू यांनी जपानतर्फे चीनला इशारा देत हे विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सैन्याच्या बळावर चीनने कितीही धमक्या दिल्या तरीही मूळ परिस्थिती बदलणार नाही. चीन डोकलाममध्ये बनवत असलेला रस्ता हा फक्त सैन्यबळावर वैध ठरवता येणार नाही. या रस्त्याच्या बांधकामाला हिंदुस्थानने अतिशय शांततेने विरोध केला आहे. हिंदुस्थानची ही वागणूक सीमेवर शांतता राखण्यास अतिशय योग्य आहे.

चीनच्या लष्कराने भूतानमध्ये घुसखोरी केली आणि सिक्कीम सीमेनजीक हिंदुस्थानच्या डोकलाम पठाराजवळ रस्ते बांधण्याचे काम सुरू केलं. चीनने केलेल्या या मुजोरीला हिंदुस्थानने विरोध केल्यामुळे दोन्हीही देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे.