नमस्ते, आपका स्वागत है...मै हूँ रेल हॉस्टेस...!

नमस्ते भारतीय रेल में आपका स्वागत है...अशा सुमधूर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये तुमचं स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको. रेल्वेमधील डब्ब्यात प्रवेश करताच हसतमुखाने स्वागत करणाऱ्या ‘रेल सुदंरी’साठी आयआरसीटीसी प्रयत्न करत आहे. भारतीय रेल्वेची अत्याधुनिक आणि वेगवान ओळख बनलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेल सुंदरी ही संकल्पना राबवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

विमानातील सुखद आणि गारेगार प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी विमानाच्या धर्तीवर रेल्वे मंत्रालयाने तेजस एक्सप्रेसची निर्मिती केली. मुंबई-करमळी मार्गावर चालणारी तेजस एक्सप्रेस अल्पावधीत लोकप्रिय ठरली. तेजसच्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) विशेष उपाययोजना करण्यात येत आहे.
विमानातील एअर हॉस्टेस अर्थात हवाई सुंदरीच्या धर्तीवर मध्य रेल्वेदेखील ‘रेल हॉस्टेस’ अर्थार ‘रेल सुंदरी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. सप्टेंबरपर्यंत या संकल्पनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास दिवाळीतील तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना ‘रेल हॉस्टेस’च्या आदरातिथ्याचा अनुभव घेता येणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधील दोन डब्ब्यांसाठी एक ‘रेल सुंदरी’ची नेमणूक करण्यात येईल. १२ डब्ब्यांमध्ये ६ रेल सुंदरी प्रस्तावित आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल हॉस्टेसची नेमणूक करण्यात येणार आहे. यावर प्रवाशांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहे. ही संकल्पना यशस्वी झाल्यास भविष्यात प्रत्येक डब्ब्यांसाठी एक रेल सुदंरी नेमण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.