स्पेनमध्ये दहशतवादी हल्ला; 13 जणांचा मृत्यू

स्पेनमधील बार्सिलोना शहरात भरघाव व्हॅन जमावामध्ये अचानक घुसल्यानं चिरडून 13 जणांचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहेत.  व्हॅनच्या धडकेत अनेकजण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्थानिक पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला आहे. एल पायस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकांना चिरडल्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये पदपथावर एक व्हॅनने काही लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक उपस्थित होते. सिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर लोकांमध्ये भितीचे वातावरण असून ते रस्त्यावर अस्थाव्यस्त पळत असल्याचे एका स्थानिकानं सांगितले आहे. घटनास्थाळावर पोलिस उपस्थित असून ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. 

स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तीन जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत आहे.  बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. ही घटना भयावह असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. 

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनने पदपथावरील लोकांना चिरडल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले दोन जण त्याच भागातील एका हॉटेलमध्ये शिरले. या दोघांकडे हत्यारे असल्याचे वृत्तदेखील रॉयटर्सने दिले आहे.