सकाळ

"/>

भागवतांना विरोध करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली

केरळमधील पलक्कड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास विरोध करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 

पलक्कड जिल्ह्यात राजकीय नेत्याच्या हस्ते ध्वजारोहण न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहभागी होऊन ध्वजारोहण केले होते. भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास विरोध केल्यानंतर भाजप कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, भागवत यांनी जिल्हाधिकाऱ्याचे आदेश न मानता ध्वजारोहण केले होते. सरकारी अनुदानित शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. सरकारी अनुदानित शाळेत नेत्याच्या हस्ते झेंडावंदन करण्याची परवानगी नाही असे निवेदन जिल्हाधिकाऱ्याने शाळेला दिले होते. नियमांनुसार शाळेतील शिक्षक किंवा शाळेच्या प्रशासकीय विभागातील व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधीच्याच हस्ते झेंडा फडकावला जाऊ शकतो असे आदेश होते. पण, तसे घडले नव्हते. देशभर या प्रकरणाची चर्चा झाली होती.

अखेर पलक्कडच्या जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता ते पंचायत संचालक म्हणून काम पाहणार आहेत. मेरीकुट्टी यांच्यासह पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी फेसबुक लिहिलेल्या पोस्टमध्ये बाबतची माहिती देण्यात आली आहे. 

सविस्तर बातमी : सकाळ