लोकमत

"/>

लवकरच पेट्रोल पंपावर मिळणार जेनरिक औषधे

केंद्र सरकारची देशभरातील पेट्रोल पंपांवर जेनरिक औषधांची दुकाने सुरु करण्याची योजना आहे. 'जन औषधी' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. जनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देणे हा योजनेमागे उद्देश असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. नजीक भविष्यात रसायन आणि खत मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या औषधनिर्माणशास्त्र विभागातंर्गत जेनरिक औषधांची दुकाने सुरु होतील अशी माहिती प्रधान यांनी दिली. 

बुधवारी पेट्रोल पंप मालक आणि एनर्जी एफिशंसी सर्विसेज लिमिटेडमध्ये पेट्रोल पंपावर विविध ऊर्जा उपकरणे आणि एलईडी ब्लब विक्रीचा करार झाल्यानंतर ते बोलत होते. ही योजना लागू करण्यामध्ये लायक औषध विक्रेत्यांची कमतरता ही मुख्य समस्या आहे. कायद्यानुसार अशा दुकानांमध्ये काम करणा-यांकडे औषधशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे. सरकारी उपक्रम असल्याने त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे त्यांनी सांगितले. अधिकारी लवकरच यातून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेतून रोजगाराच्याही संधी निर्माण होणार आहेत. 

वर्षभरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशभरात ३ हजार जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यात शासनातर्फे जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येतील, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले होते.  आज औषधांच्या अवाढव्य किमती आणि उपचारांच्या न परवडणाऱ्या खर्चामुळे सामान्य माणूस डॉक्टरांकडे जाण्यास धजावत नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे कितीतरी रुग्ण आहेत, जे डॉक्टरांकडे गेले असते तर वाचले असते. म्हणून जेनरिक औषधे जास्तीतजास्त बाजारात येणे आवश्यक आहे. यासाठी जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे बापट यांनी म्हटले होते. 

डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त
 किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागच्यावर्षी घेतला.  किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारार्थ लागणाऱ्या १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करांतून मुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

सविस्तर बातमी : लोकमत