लोकसत्ता 

"/>

प्रकाश मेहता, सुभाष देशमुख यांच्यावर संघ, तर सुभाष देसाईंवर उद्धव ठाकरे नाराज

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती नाराजी कळविली आहे. ‘वैयक्तिक’ लाभापेक्षा पक्षहित मोठे, या न्यायाने शिवसेनेला मदत करण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही नाराज आहेत. त्यामुळे लवकरच या मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

ताडदेव येथील एम पी मिल झोपु प्रकल्पासह मेहता यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक प्रकरणांमध्ये आरोप झाले. एमपी मिल प्रकल्पासह काही प्रकरणे लोकायुक्तांकडे चौकशीसाठी सोपविली जाणार आहेत. तर सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूह व अन्य बाबींमध्ये बऱ्याच तक्रारी असून शेतकऱ्यांना पत्ताही नसताना त्यांच्या नावाने कर्जे उचलण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत. मात्र या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना फडणवीस हे त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने जनमानसात चुकीचा संदेश जात आहे व त्यांच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे. विरोधी पक्षात असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर व चौकशीची मागणी केल्यावर मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली आणि काही वेळा ते घेतलेही गेले. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचाही राजीनामा चौकशीआधी घेण्यात आला. तोच न्याय या मंत्र्यांनाही लावावा, असे मत संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.

सविस्तर बातमी : लोकसत्ता