लोकसत्ता

"/>

अमेरिकेकडून हिज्बुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनलिटी अॅक्ट अंतर्गत हिज्बुल मुजाहिद्दीनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. संघटनेचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशवादी घोषित केल्यानंतरच्या दोनच महिन्यांनंतर अमेरिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उजेडात आणणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे.

अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे अमेरिकेतील संघटनेच्या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही. अमेरिकेच्या निर्णयामुळे हिज्बुलची मोठी कोंडी झाली आहे. १९८९ मध्ये स्थापन झालेली ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करते आहे. या संघटनेचे अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय आहेत.

अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनच्या नाड्या आवळल्यामुळे अमेरिकेतील संघटनेची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाईल. याशिवाय या संघटनेसोबत कोणतेही व्यवहार न करण्याचे आवाहन अमेरिकेन सरकारकडून नागरिकांना करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीआधीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिज्बुलचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. यामुळे अमेरिकन नागरिकांना सय्यद सलाहुद्दीनसोबत आर्थिक व्यवहार करता येण्यावर निर्बंध आले.

सविस्तर बातमी : लोकसत्ता